राहाता तालुक्यातील शेतकरीच करणार पिकांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:24 IST2021-08-13T04:24:45+5:302021-08-13T04:24:45+5:30
पीकपाहणी अहवाल वेळेत संकलित होण्याच्या दृष्टीने व त्यात पारदर्शकता आणण्याबरोबरच या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ...

राहाता तालुक्यातील शेतकरीच करणार पिकांची नोंद
पीकपाहणी अहवाल वेळेत संकलित होण्याच्या दृष्टीने व त्यात पारदर्शकता आणण्याबरोबरच या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ई-पीकपाहणी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे़ फार्मर फ्रेन्डली अॅपचे नाव आहे. याद्वारे शेतकरी स्वत:च पीकपेरणी नोंदवू शकणार आहेत. यासाठी शेताचे फोटो काढून अॅपवर अपलोड करावे लागतील. पिकाबाबत माहिती भरावी लागेल. अॅपद्वारे ही माहिती क्षणभरातच तलाठ्याकडे येईल, त्यांनी मान्यता देताच ही पीकपाहणी उताऱ्यावर दिसू लागेल. याचप्रकारे कायम पड, बांधावरची झाडेही नोंदवता येणार आहेत. यामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होईल तसेच पीकविमा आणि पीकपाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. याशिवाय, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत मिळण्यासाठीही या प्रणालीचा उपयोग होणार आहे.
.......................
निवडक २० तालुक्यांत राहात्याचा समावेश
राज्यातील दहा जिल्ह्यांतील निवडक वीस तालुक्यांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला. आता १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ई-पीकपाहणी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गावपातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायक किंवा तलाठी, तर पर्यवेक्षक म्हणून कृषी अधिकारी किंवा मंडलाधिका-यांवर जबाबदारी देण्यात आली आहे़