मासेमारीसाठी गेलेल्या वृध्दाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 16:52 IST2020-05-22T16:51:17+5:302020-05-22T16:52:00+5:30
भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.

मासेमारीसाठी गेलेल्या वृध्दाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू
राजूर : भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
श्रावण मधे हे नेहमीप्रमाणे आपला जेवणाचा डबा घेऊन मासेमारीसाठी बुधवारी सकाळीच भंडारदरा धरणस्थळी गेले होते. धरणाच्या पाण्यात ते गळ टाकून मासेमारी करीत असे. बुधवारी रात्री ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा नवसू श्रावणा मधे हा गुरुवारी सकाळीच ते मासेमारीसाठी बसतात त्या ठिकाणी गेला. ते तेथे न दिसल्याने त्याने दिवसभर आपल्या वडिलांचा शोध घेतला. सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी त्यांचा मृतदेह धरणाच्या २०० च्या मोरी समोरील पाण्यावर तरंगताना दिसून आला. तशी खबर त्यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तात्काळ पोलीस नाईक किशोर तळपे घटनास्थळी पोहोचले. स्थानिक आणि होडीवाल्यांच्या मदतीने तळपे यांनी मयत श्रावणचा मृतदेह होडीत टाकून गुरुवारी रात्री धरणातून बाहेर काढला. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शुक्रवारी सकाळी वैद्यकीय अधिकाºयांनी शवविच्छेदन करून मयत श्रावण मधे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.