अहमदनगर : शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या घोषणेनंतर आता पुढचा टप्पा महामंडळांचा असणार आहे. महामंडळांच्या नियुक्त्यांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांच्या अशा पल्लवित झाल्या असून, महामंडळावर कुणाला संधी मिळणार, काेणता निकष लावणार, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. परंतु, सरकारने देवस्थानांचे विश्वस्त व महामंडळावरील नेमणुका केल्या नव्हत्या. शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षांसह विश्वस्त मंडळाच्या नेमणुका रखडल्या होत्या. राज्य शासनाने शिर्डी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची गुरुवारी घोषणा केली. उशिरा का होईना, पण शिर्डी विश्वस्त मंडळाची घोषणा केली. शिर्डी देवस्थाननंतर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून होती. शिर्डी देवस्थाननंतर आता महामंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. राज्य शासनाकडून पुढील आठवड्यात महामंडळांची घोषणा होऊ शकते, असे काहींचे म्हणणे आहे. महामंडळांची यादी तयार करण्याचे कामही वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्याचे समजते. महामंडळावर जाण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, विविध पक्षांतील पदाधिकारी, माजी आमदार, तालुक्यातील नेते इच्छुक आहेत. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याने महामंडळांचीही विभागणी होणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना कमी जागा मिळणार आहेत. महामंडळांच्या जागा कमी आणि इच्छुक जास्त, अशी परिस्थिती तिन्ही पक्षांत पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. संगमनेर आणि श्रीरामपूर काँग्रेसकडे आहे. शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. नेवासाचे शंकरराव गडाख यांच्या रूपाने सेनेला एक मंत्री पद मिळाले. महामंडळावर जाण्यासाठी सेना व राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक आहेत. इच्छुकांनी प्रयत्न सुरू केल्याने महामंडळासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
......
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळाची आस
जिल्ह्यातील सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी वर्षानुवर्षे पक्षाचे काम करत आहेत. भाजपच्या कार्यकाळात युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांना शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी संधी दिली गेली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. त्यासाठी पक्षसंघटनेत काम करणाऱ्यांनी मेहनत घेतली. पक्षाचे काम करणाऱ्यांना महामंडळावर संधी मिळणार की अन्य नेत्यांना, याबाबत उत्सुकता आहे.