Nitin Shete latest News: अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर संस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन सूर्यभान शेटे (वय ४४ )यांनी त्यांच्या राहत्या घरातच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिवेशनात शनि शिंगणापूर संस्थानच्या कामातील भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजले. मुख्यमंत्र्यांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून संबंधित लोकसेवकांच्या संपत्तीची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा केली होती. चौकशी सुरू असतानाच ही घटना घडली. त्यामुळे याचा त्यांच्याशी संबंध जोडला जात आहे. पण, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबद्दल वेगळी माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागील काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान सध्या विविध मुद्यांमुळे चर्चेत आहे. बोगस कर्मचारी भरती व अँप घोटाळा मुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत शनिशिंगणापूर प्रकरणी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केली होती. याला मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत चौकशीचे आदेश दिले होते. सध्या देवस्थानची मुंबई धर्मादायमार्फत चौकशी सुरु आहे. ऑनलाईन पूजा अँप प्रकरणी अहिल्यानगर सायबर विभागाकडे चौकशी सुरु आहे.
पोलीस अधीक्षक नितीन शेटे मृत्यू प्रकरणावर काय बोलले?
"या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस करत आहे. या प्रकरणामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब सायबर पोलिसांनी नोंदवले आहेत. पण, नितीन शेटे यांना पोलिसांनी कधीही चौकशीसाठी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सी बजावण्यात आले नव्हते", असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
एकीकडे नितीन शेटे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संबंध ऑनलाईन पूजा अँप प्रकरणाच्या चौकशीशी जोडला जात असताना पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीने नवी शंका उपस्थित होऊ लागली आहे. नितीन शेटे यांनी या चौकशीच्या प्रकरणातून नव्हे तर वेगळ्याच कारणाने केली का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
आधी विश्वस्त, नंतर इंजिनिअर आणि आता उप कार्यकारी अधिकारी
उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली? या बाबत अद्याप खुलासा झालेला नाही. शेटे यांनी सुरवातीला काही काळ देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. नंतर ते देवस्थान मध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरीला रुजू झाले.
आता सध्या ते देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. माजी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. त्यांच्या आत्महत्या मागील कारण अजून गुलदस्तात आहे. त्यांच्या निधनाने शनिशिंगणापूर व सोनई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.