राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुहेरी हत्याकांड, मुख्य सूत्रधार उल्हास माने गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 12:17 IST2018-05-05T12:15:48+5:302018-05-05T12:17:57+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार उल्हास मानेला अटक करण्यात आले आहे.

NCP workers Double murder : main Accused Ulhas Mane arrested | राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुहेरी हत्याकांड, मुख्य सूत्रधार उल्हास माने गजाआड

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं दुहेरी हत्याकांड, मुख्य सूत्रधार उल्हास माने गजाआड

अहमदनगर -  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार उल्हास मानेला अटक करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद उर्फ स्वामी गायकवाडला (वय 20 वर्ष) अटक करण्यात आली होती. जामखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. मुजावर यांनी त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गायकवाडला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरूवार 3 मे रोजी मांडवगण फराटा (पुणे) येथून अटक केले होते. जामखेडमध्ये २८ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.  

बाचाबाची ते हत्याकांड
गोविंद गायकवाड व राळेभात बंधू यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून वितुष्ट होते. डिसेंबर २०१६मध्ये राळेभात कुटुंबीयांच्या परिचयातील एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावरून जात असताना गोविंद गायकवाडकडून त्या वृद्धाच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडाले. त्यामुळे वृद्धाने याचा जाब गोविंदला विचारला. त्याचा राग आल्याने गोविंदने त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. याबाबत संबंधित वृद्धाने योगेश राळेभात व राकेश राळेभात यांना माहिती दिली. त्यानंतर राळेभात बंधूंनी गोविंदला गाठून मारहाण केली. तेथूनच या वादाला सुरूवात झाली. पुढे हा वाद विकोपाला गेला, परंतु काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते भांडण मिटले. त्यामुळे पोलीस ठाण्यात फिर्याद आलीच नाही. त्यानंतर या दोन गटांत कायमच खुन्नस राहिली. रस्त्याने येता-जाता रागाने पाहणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरूच होते. 
राळेभात गटाचे हे वर्चस्व सहन न झाल्याने गोविंद गायकवाडने राळेभात बंधूंचा काटा काढण्याचा निश्चय केला. योगेश व राकेश एकाच वेळी एकांतात कुठे भेटतील, अशा संधीच्या शोधात तो गेल्या अडीच महिन्यांपासून होता. हत्येच्या घटनेपूर्वीही त्याने एक-दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी ठरला नाही. अखेर गोविंदने दि. २८ रोजी सायंकाळी योगेश व राकेश यांना एकांतात गाठलेच. गोविंदने योगेशवर, तर दुसऱ्या अल्पवयीन साथीदाराने राकेशवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात तिसरा आरोपी विजय सावंत याचाही सहभाग होता. परंतु तो अद्याप फरार आहे, अशी कबुली खुद्द गोविंद व त्याच्या साथीदाराने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेशातून आणले पिस्तूल
राळेभात गटासोबत रोजच होणा-या कटकटीला गोविंद वैतागला होता. एक काय तो निकाल लावण्याचा चंग त्याने बांधला. त्यातूनच हत्येचा प्लॅन पुढे आला. योगेश व राकेश यांना मारण्यासाठी गोविंदने दोन पिस्तुल व काही काडतुसे मध्य प्रदेशला जाऊन आणली. पोलिसांनी आता ती जप्त केल्याचे समजते.

Web Title: NCP workers Double murder : main Accused Ulhas Mane arrested