मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:39 IST2021-01-11T13:34:21+5:302021-01-11T13:39:48+5:30
विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली.

मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाचा मृत्यू
कर्जत : विवाहप्रसंगी मंगलाष्टके सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाला अन् त्यामध्येच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी दुपारी कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे घडली.
विवेक प्रकाश जगताप (रा. भूम, जि. उस्मानाबाद), असे मृत नवरदेवाचे नाव आहे. विवाह सोहळा चिलवडी येथील करमाळा रस्त्यालगत असलेल्या नागेश्वर मंदिरात होता. चिलवडी येथील रहिवासी दिलीप धोंडिराम राऊत यांच्या कन्येचा विवाह भूम तालुक्यातील विवेक प्रकाश जगताप यांच्याशी होता. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मंगलाष्टके सुरू होती. चार मंगलाष्टके झाली होती. उपस्थितांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर शेवटचे पाचवे मंगलाष्टक सुरू होणार होते. इतक्यात नवरदेला चक्कर आली. वरबाप व संयोजक, वऱ्हाडी मंडळीची एकच धावपळ उडाली. मंडपात कोसळलेल्या वराला तत्काळ उचलून राशीन येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली. मात्र, येथे येण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने विवेक जगताप यांचे निधन झाल्याचे तेथे स्पष्ट झाले. दरम्यान, या विवाहासाठी डीजे लावण्यात आल्याचे समजते. डीजेच्या गाण्यावर नवरदेवानेही काही काळ नृत्य केल्याची गावात चर्चा होती.