नागवडे अपक्ष आमदार होऊ शकतात-सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 13:37 IST2019-10-06T13:35:22+5:302019-10-06T13:37:00+5:30
श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे.

नागवडे अपक्ष आमदार होऊ शकतात-सुजय विखे
अहमदनगर : श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात. परंतु त्यांचा निवडून आल्यानंतर काही उपयोग होणार नाही. कारण मला पक्षाचेच काम करावे लागेल, असे सांगत खासदार सुजय विखे यांनी अप्रत्यक्षपणे नागवडे यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे.
श्रीगोंदा येथे शनिवारी नागवडे समर्थकांच्या मेळाव्यात विखे यांनी हे वक्त्यव्य केले. श्रीगोंद्यातून भाजपची उमेदवारी बबनराव पाचपुते यांना मिळाली आहे. असे असताना नागवडे या अपक्ष आमदार होऊ शकतात, असे वक्त्यव्य विखे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या काळात एबी फॉर्म माझ्या गाडीत असायचे. पण, भाजप हा पक्ष असा आहे की जेथे गडबडी होत नाहीत, असेही ते म्हणाले.
दरम्यान पाचपुते व आमचे जमत नाही पण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यास काही कटू निर्णय घेऊ शकतो, असे राजेंद्र नागवडे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे नागवडे काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे. विखे हे पाचपुते यांच्या उमेदवारीला अनुकूल नव्हते असा संदेश सुजय विखे यांच्या विधानातून गेला आहे. नागवडे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी विखे हे सुरूवातीपासून प्रयत्नशील होते. त्यामुळे विखे-नागवडे हे पाचपुते यांना मनापासून साथ देणार का? ही शंका उपस्थित होत आहे. पाचपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीने ऐनवेळी घनशाम शेलार यांना उमेदवारी दिली आहे. शेलार हे काही महिन्यापूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. ते आता निवडणुकीची कशी तयारी करणार यावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आहे. श्रीगोंदा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी पाचपुते यांच्या घरासमोर ऊस दरासाठी दोन महिन्यापासून आंदोलन सुरू केले असून तेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांनी सर्व प्रस्थापितांवर हल्लाबोल सुरू केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील मतदारही संभ्रमात आहेत. तालुक्यात लढत नक्की कोणात होणार? हे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही.