ग्राहक संरक्षण परिषद स्थापनेच्या हलचाली
By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:12:20+5:302014-07-17T00:29:01+5:30
अहमदनगर: ग्राहकांसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापनेच्या हलचाली सुरू झाल्या आहेत़

ग्राहक संरक्षण परिषद स्थापनेच्या हलचाली
अहमदनगर: ग्राहकांसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापनेच्या हलचाली सुरू झाल्या आहेत़ परिषद सदस्य पदासाठी जिल्हाभरातून ५९ अर्ज दाखल झाले असून,याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे ग्राहकांना न्याय मिळण्यास एकप्रकारे मदत होणार आहे़
ग्राहकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्य शासनाने मागील वर्षी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला़ मात्र अद्याप ही परिषद स्थापन होऊ शकली नाही़ त्यात शासनाने परिषद निवडीच्या कायद्यात सुधारणा केली असून, सदस्य पदासाठीचे अर्ज मागविण्यास हिरवा कंदील दाखविला आहे़ त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने सदस्य पदासाठी अर्ज मागविले होते़ त्यास प्रतिसाद मिळाला आहे़ जिल्ह्यातून सदस्य पदासाठी ५९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत़ प्राप्त झालेल्या अर्जातून २८ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे़ या निवडीसाठीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे़
परिषद स्थापनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या़ मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून सदस्यांची यादी प्राप्त झाली नाही़ त्यामुळे परिषद स्थापनेस विलंब झाला़ निवड प्रक्रियेत त्रुटी दूर करून शासनाने परिषद निवडीच्या कायद्यात सुधारणा केली़ सुधारित कायद्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने अर्ज मागविले असून, त्यास प्रतिसाद मिळाला़ यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महापालिका, नगरपरिषद, ग्राहकसंघटनांचे प्रतिनिधी,महाविद्यालयांचे प्रतिनिधी, वैद्यकीय व्यवसायांचे प्रतिनिधी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पेट्रोल, गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)
काय आहे ग्राहक संरक्षण परिषद
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना काही हक्क प्रदान करण्यात आले आहेत़ शासनाने दिलेल्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात येत आहेत़ या परिषदेत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना न्याय देण्याची कार्यवाही केली जाईल़.
कोण असतील सदस्य
ग्राहक संघटनांचे सहा प्रतिनिधी
ग्राहक हिताशी संबंधित पाच प्रतिनिधी
एका शेतकऱ्याची नियुक्ती
व्यापार व उद्योग क्षेत्रातील एकाची नेमणूक
सदस्य निवडीसाठी समिती
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे़ या समितीचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष हे असतील़ जिल्हा पुरवठा अधिकारी समितीचे निमंत्रक असून,या समितीच्या नियंत्रणाखाली ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे़
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापनेच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे़सुधारित नियमानुसार अर्ज मागविण्यात आले असूऩ, प्राप्त झालेले अर्ज निवड समिती समोर सादर केले जाणार आहेत़ निवड समितीकडून सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाईल़
- सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी