जामखेड : चुंभळी येथील अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणा-या चाळीस वर्षाच्या पुरुषाने अत्याचार केला. त्यानंतर आरोपी फरार झाला. बालाजी अंबादास डाडर या आरोपीने चाकूने मारहाण करून अत्याचार केला. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील चुंभळी येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेली अकरा वर्षीय पिडीत मुलगी ही आपल्या आई वडीलांना समवेत राहते. १२ रोजी पिडीत मुलीचे वडील जामखेडला व आई ही विटभट्टीवर कामाला गेले असता सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारा आरोपी बालाजी अंबादास डाडर (वय ४० वर्षे.रा.चुंबळी. ता जामखेड) याने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरामध्ये बोलावले. घराचा दरवाजा आतून बंद करुन मारहाण करुन अत्याचार केला. दुस-या दिवशी (दि १३) रोजी रात्री आठ वाजता पुन्हा या मुलीस घरी बोलावून चाकूने मारहाण करून घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली. यानंतर पिडीत मुलीने घटना झालेली आपल्या आईवडिलांना सांगितली. आई -वडीलांनी जामखेड पोलिस स्टेशनला धाव घेतली. या अगोदर देखील आरोपीने अनेक वेळा या मुलीची छेडछाड करुन त्रास दिला होता अशी माहिती पिडीत मुलीच्या आईवडिलांकडुन सांगण्यात येत आहे. घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. सध्या आरोपी हा फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.
जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:16 IST