मेहंदीही सुकली नाही तोच काळाचा घाला

By Admin | Updated: May 11, 2014 00:55 IST2014-05-11T00:52:07+5:302014-05-11T00:55:03+5:30

कोपरगाव : र उद्या (दि. ११) लग्नाच्या रिसेप्शनसाठी सर्वांना आमंत्रित केलेले, भावी आयुष्याची स्वप्ने रंगवण्यास कुठे नुकतीच सुरूवात झाली होती. परंतु नियतीला जणू हे मंजूरच नव्हते.

The mehandi did not get dry | मेहंदीही सुकली नाही तोच काळाचा घाला

मेहंदीही सुकली नाही तोच काळाचा घाला

कोपरगाव : एक मे रोजी थाटामाटात विवाह झाला, अजून मेहंदीही सुकली नव्हती, इतकेच नव्हे तर उद्या (दि. ११) लग्नाच्या रिसेप्शनसाठी सर्वांना आमंत्रित केलेले, भावी आयुष्याची स्वप्ने रंगवण्यास कुठे नुकतीच सुरूवात झाली होती. परंतु नियतीला जणू हे मंजूरच नव्हते. नगर-मनमाड रस्त्यावरील कोपरगाव बेट नाक्यावर नवदाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत वधू जागेवरच ठार झाली अन् आयुष्यभरासाठी त्यांनी मारलेली गाठ मात्र दहा दिवसांतच सुटली. नगर येथील महिंद्रा कंपनीतील अभियंता असलेल्या तुकाराम मारोती तिखांडके (अस्तगाव, ता़ नांदगाव, जि़ नाशिक) यांचा विवाह १ मे २०१४ रोजी सुनीता हिच्याशी झाला़ मोठ्या उत्साहाने तुकाराम यांनी रिसेप्शनपूर्वी सुनीताला फिरविण्यासाठी नगरला नेले़ तेथे लग्नात काढलेल्या फोटोंचा अल्बम तयार केला़ ११ मे रोजी अस्तगाव येथे रिसेप्शन ठेवले होते़ रिसेप्शनला जाण्यासाठी दोघेजण आपल्या दुचाकीवर (एमएच ४१ यू ६०९१) निघाले़ कोपरगाव येथील बेट नाक्यावर ते आले तेव्हा नगर-मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे ते शिकार बनले़ घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला़ पोलीस उपनिरीक्षक पूजा बक्षी यांनी पंचनामा केला़ अ‍ॅम्बुलन्सच्या साहाय्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला़ परंतु प्रत्यक्षदर्शींनीसुद्धा मृतदेह पाहिल्यानंतर हळहळ व्यक्त करीत होते़ नवविवाहितेच्या हाता-पायावरची मेहंदीही सुकलेली नव्हती़ या प्रकरणी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हार ते कोपरगाव या टप्प्याचे काम अद्याप बाकी आहे़ या टप्प्यात पडलेल्या खड््ड्यांमुळेच या नवविवाहितेला प्राणास मुकावे लागले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी) खड्डा चुकविण्याच्या नादात पाठीमागून येणार्‍या एमएच ०४ एयू ४५२७ क्रमांकाच्या ट्रकने तुकाराम तिखांडके यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली़ या धडकेत सुनीता उडून ट्रकच्या चाकाखाली सापडली़ डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: The mehandi did not get dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.