लखमापुरीत चाकू हल्ला करत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST2021-03-01T04:25:38+5:302021-03-01T04:25:38+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथे रविवारी (दि.२८) पहाटे दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील व्यक्तींवर चाकू हल्ला ...

Lakhmapuri knife attack and theft | लखमापुरीत चाकू हल्ला करत चोरी

लखमापुरीत चाकू हल्ला करत चोरी

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील लखमापुरी येथे रविवारी (दि.२८) पहाटे दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील व्यक्तींवर चाकू हल्ला करत लाकडी दांडा, टाॅमीने जबर मारहाण केली. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ५० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत प्रमोद पुंजाराम निर्मळ (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लखमापुरी येथील मराठी शाळेनजीक राहत असलेल्या प्रमोद पुंजाराम निर्मळ यांच्या खोलीचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दीडच्या सुमारास आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रमोद यांच्या आईला जाग आली. त्यांनी प्रमोद यांना उठविले. त्यावेळी चोरट्यांनी प्रमोद यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत हात व दंडावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. आवाज ऐकून शेजारील खोलीत झोपलेले प्रमोद यांचे लहान बंधू अप्पासाहेब उठून बाहेर आले. त्यांनाही चोरट्यांनी मारहाण केली. आरडाओरड झाल्याने घरापासून काही अंतरावर बाहेर झोपलेले प्रमोद यांचे वडील पुंजाराम निर्मळ (५५) उठले. त्यांचीही चोरट्यांसोबत झटापट झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, कपाटाची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील अंदाजे ३० हजारांची रोकड, सोन्याचे वेल, झुंबर व बाळ्या असे दागिने घेऊन पळ काढला. आरडाओरड ऐकून उठलेल्या ग्रामस्थांनी पाठलाग करून काही चोरट्यांना चोपही दिला. चोरटे पाच ते सहाजण असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच सकाळी शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक अण्णा पवार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस काॅन्स्टेबल अभय लबडे, आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले.

Web Title: Lakhmapuri knife attack and theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.