अगस्ती आश्रमाच्या भक्त निवासात उभारले कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:52+5:302021-04-16T04:19:52+5:30

अकोले : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अगस्ती आश्रमातील भक्त निवासामध्ये १५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले ...

Kovid Center erected in the Bhakt Niwas of Agastya Ashram | अगस्ती आश्रमाच्या भक्त निवासात उभारले कोविड सेंटर

अगस्ती आश्रमाच्या भक्त निवासात उभारले कोविड सेंटर

अकोले : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अगस्ती आश्रमातील भक्त निवासामध्ये १५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शुक्रवारी (दि.१६) आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते, अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सरताराम गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.

बुधवारी लहामटे, गायकर, तहसीलदार यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. या नव्या कोविड सेंटरमुळे अकोलेकरांना दिलासा मिळणार आहे.

शहरालगत खानापूर येथे १०० बेडचे सरकारी कोविड केअर केंद्र सुरू असून यात १४ ऑक्सिजन बेड होते. तेथील ऑक्सिजन बेडची संख्या ३० करण्यात आली आहे. समशेरपूर, राजूर, कोतूळ या तीन ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी तीस बेडचे शासकीय कोविड सेंटर सुरू आहे. काही डाॅक्टरांनी एकत्र येत दोन ठिकाणी अल्प दरात सुविधा देणारे कोविड सेंटर सुरू केले आहे. राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या प्रयत्नांतून सरकार व देणगीदार यांच्या मदतीने महिलांसाठी ५० व पुरुषांसाठी ५० असे दोन ठिकाणी १०० बेडचे कोविड सेंटर सुरू झाले.

अगस्ती आश्रमातील नव्या भक्त निवास येथे प्रशासन व साखर कारखाना, समाजसेवी संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून १५० बेडचे सेंटर सुरू होत आहे. गरज पडल्यास बेड संख्या वाढविली जाणार आहे. रुग्णांसाठी जेवण व नाश्त्याची सोय प्रशासन करणारा असून इतर सुविधा अगस्ती कारखाना, समाजसेवी करणार आहेत.

यावेळी परबत नाईकवाडी, भानुदास तिकांडे, महेश नवले, अशोक देशमुख, गुलाब शेवाळे, कचरू शेटे, अशोक आरोटे उपस्थित होते.

--

समशेरपूरला वाढीव बेडचे सेंटर हवे..

तालुक्यात रूंभोडी-इंदोरी, राजूर, समशेरपूर ही गावे कोरोना हाॅटस्पाॅट बनली आहेत. अवघ्या दोन दिवसात रूंभोडी, इंदोरीत कोरोनाने सहा बळी घेतले. यात तीन तरुणांचा समावेश असल्याने परिसर हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना मृत्युदर मोठा असल्याचे नागरिक प्रवीण धुमाळ सांगतात. तर समशेरपूर येथे वाढीव बेडचे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी कार्यकर्ते कैलास जाधव यांनी केली आहे.

Web Title: Kovid Center erected in the Bhakt Niwas of Agastya Ashram