कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे अखेर अजित पवार गटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 21:22 IST2023-07-12T21:17:12+5:302023-07-12T21:22:22+5:30
आमदार आशुतोष काळे आणि आमदार डाॅ. किरण लहामटे यांचा अजित पवारांना पाठिंबा.

कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे अखेर अजित पवार गटात
अहमदनगर : मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी (दि. १२) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पाठिंबा दिला. याबाबत आमदार काळे यांनीच फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. ‘आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत आहेत. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत, याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदारसंघातील मतदारांचा पूर्ण पाठिंबा राहील याची मला खात्री आहे.’ असा विश्वास आमदार काळे यांनी आपल्या पाेस्टवर व्यक्त केला आहे. आमदार काळे हे परदेशातून परतल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे.
अकोलेचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी भावनेपेक्षा विकासाला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देण्याचे निश्चित केले आहे. बुधवारी अकोले शहरातील महात्मा फुले चौक, कारखाना रोड, बसस्थानक परिसरात त्यांनी विकासकामांची पाहणी करून आपली भूमिका स्पष्ट केली. लहामटे समर्थकांनी व तालुक्यातील सहकारातील नेत्यांनी अजित पवार यांच्याकडेच कल निश्चित केला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री त्यांनी देवगिरी गाठली. तालुक्यातील विकासकामांविषयी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालय, लघु औद्योगिक वसाहत, तोल्हार खिंड, घाटनदेवी घाट रस्ता, २०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे लोअर आंबित, बितका, तालुक्यातील रस्त्यांसाठी निधीचे प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मिळाल्यानंतर पुन्हा आमदार तालुक्यात जनतेत फिरले आणि बुधवारी अजित पवार यांनाच पाठिंबा जाहीर केला.