जामखेड हॉटेल गोळीबार प्रकरण: पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी कट्ट्यासह तिघे जेरबंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 20:46 IST2025-12-21T20:44:40+5:302025-12-21T20:46:21+5:30
जामखेड येथील 'हॉटेल कावेरी' येथे गुरुवारी मध्यरात्री घुसून चार जणांनी तोडफोड केली होती.

जामखेड हॉटेल गोळीबार प्रकरण: पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी कट्ट्यासह तिघे जेरबंद!
Jamkhed Hotel Firing : बीड रोडवरील 'हॉटेल कावेरी'मध्ये १० ते १२ जणांनी गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री हल्ला करून साहित्याची तोडफोड केली होती. तसेच, हॉटेलमालक रोहित पवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि डीव्हीआर पोलिसांनी हस्तगत केला. न्यायालयाने आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उल्हास माने, शुभम शहाराम लोखंडे व बालाजी शिवाजी साप्ते (रा. आष्टी) अशी या आरोपींची नावे आहेत.
जामखेड येथील 'हॉटेल कावेरी' येथे गुरुवारी मध्यरात्री घुसून चार मुख्य आरोपींसह इतर अनोळखी सातजणांनी तोडफोड केली. हॉटेलमालक रोहित अनिल पवार यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता. त्यात त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक या गुन्ह्याचा तपास करीत असताना, त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नगर-सोलापूर रोडवर 'श्याम हॉटेल' समोर आरोपी उभे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुभम शहाराम लोखंडे व बालाजी शिवाजी साप्ते यांना शिताफीने ताब्यात घेतले. शुभम लोखंडे याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक डीव्हीआर आढळून आला असून, हा कट्टा गुन्ह्यात वापरला आहे की नाही, याचा तपास पोलिस करीत आहेत.