श्रीरामपूर तालुक्यात अवकाळीने नुकसान, गहू, द्राक्षला फटका; खासदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश
By शिवाजी पवार | Updated: March 8, 2023 18:02 IST2023-03-08T18:01:25+5:302023-03-08T18:02:49+5:30
Unseasonal Rain : प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर, कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, तसेच मालुंजे, मांडवे या परिसरामध्ये गहू तसेच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

श्रीरामपूर तालुक्यात अवकाळीने नुकसान, गहू, द्राक्षला फटका; खासदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू व लाल कांद्याचे नुकसान झाले आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर, कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, तसेच मालुंजे, मांडवे या परिसरामध्ये गहू तसेच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला. त्यामुळे या गव्हाची सोंगणी करणे अवघड झाल्याची माहिती शेतकरी भरत थोरात, प्रकाश थोरात, संदीप थोरात, जगदिश पवार आदींनी दिली. काढणीला आलेल्या द्राक्षांना अवकाळीने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटणार आहे.
दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सहा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी तसेच महसूल आयुक्त यांनाही त्यांनी पत्र दिले आहे.