दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात पती- पत्नी गंभीर जखमी; लोणीव्यंकनाथ येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 16:25 IST2025-10-22T16:25:08+5:302025-10-22T16:25:36+5:30
जखमींना दौड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात पती- पत्नी गंभीर जखमी; लोणीव्यंकनाथ येथील घटना
श्रीगोंदा (जिल्हा अहिल्यानगर) : दिवाळीचे लक्ष्मीपुजन करुन बाळासाहेब निकम, वैशाली निकम झोपले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्यात बाळासाहेब व वैशाली रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना लोणीव्यंकनाथ शिवारात अहिल्यानगर ते दौड वरील रेल्वेगेटजवळ मंगळवारी रात्री घडली. जखमींना दौड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
बाळासाहेब निकम हे फुले व फळे विकण्याचा रेल्वे गेट जवळ व्यवसाय करतात. बाळासाहेब निकम, वैशाली निकम हे पती- पत्नी झोपले असताना दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. चाकू,सत्तुरने वार केले. बाळासाहेब व वैशाली दोघे जखमी झाले. ४० हजाराची रोकड व एक तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
बाळासाहेब यांचा मुलगा बापू हे शेजारच्या खोलीत होते. त्या घराचा दरवाजा उघडला व लक्ष्मीपुजन केलेले तीन हजाराची रोकड लंपास केली
आणि महादेववाडीच्या दिशेने दरोडेखोर पायी निघून गेले.
लोणीव्यंकनाथ मध्ये गुन्हेगारी वाढली
लोणीव्यंकनाथ परिसरात गेल्या वर्ष भरा पासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पण चोऱ्या टाळण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही जनजागृती अथवा गुन्हेगारांना जरब बसेल अशी अॅक्शन घेतली जात नाही. उलट एखादा चोरीची फिर्याद देणेसाठी श्रीगोंदा पोलिसला गेला की कुठून आणले होते पैसे? सोने खरेदीच्या पावत्या आहेत का! तुमचा दरवाजा उघडला होता कि बंद ? असे प्रश्न उपस्थित करुन हिनवले जाते. त्यामुळे चोरी होऊनही पोलिस स्टेशन कडे फिरकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.