पोलिसांच्या माणुसकीतून लॉकडाऊनमध्ये शिर्डीत अडकलेल्या कुटुंबाची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:58 IST2020-06-28T15:57:11+5:302020-06-28T15:58:12+5:30
साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून झालेली घरवापसी झाली.

पोलिसांच्या माणुसकीतून लॉकडाऊनमध्ये शिर्डीत अडकलेल्या कुटुंबाची घरवापसी
प्रमोद आहेर ।
शिर्डी : साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून झालेली घरवापसी झाली.
नालासोपारा येथील डावरे कुटुंब चप्पल शिवण्याचा धंदा करतात. योगेश पुंडलिक डावरे (वय-२१) हा क्षयरोगाने आजारी होता. भाऊ दिनेश, वडील पुंडलिक डावरे व आत्या सुमनबाई जाधव हे वीस हजार रूपये घेऊन मनमाडमधील दवाखान्यात उपचारासाठी आले होते. तेथे काही दिवस उपचारानंतर जवळचे पैसे संपले. जवळच शिर्डी असल्यामुळे साईबाबांचे दर्शन घेऊन घरी परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला. शिर्डीत येऊन दर्शन घेतले. लॉकडाऊन सुरू झाला. अन डावरे कुटुंब शिर्डीत अडकले़ बसस्थानकावरच आठ-दहा दिवस काढले. प्रशासनाने निघोज येथील पालखी निवा-यात त्यांना पाठवले.
योगेशची तब्येत बिघडल्याने सरकारी डॉक्टरांनी लोणी येथे पाठवले़. तेथून त्यांना नगरला पाठवण्यात आले़. नगरला दहा दिवस उपचार करून त्यांना पुन्हा शिर्डीला पाठवण्यात आले. कसेतरी ते दिवस काढत होते. नातेवाईकांनीही पैसे पाठवयाला नकार दिल्याने अक्षरश: भिक्षेक-यांचे जीवन वाट्याला आले़.
२२ मे रोजी सायंकाळी एका दुकानासमोर आश्रयाला असलेल्या योगेशने डोळे मिटले़ त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पण उपयोग झाला नाही़. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व शिर्डी पोलिसांनी या मुलाचा अंत्यविधी पार पाडला. त्यानंतर पोलिसांनी बेघर लोकांची धरपकड केली. तेव्हा या कुटुंबाने आपली व्यथा वाकचौरे यांच्यासमोर मांडली. वाकचौरे यांनी नगरपंचायतमधून योगेशचा मृत्युचा दाखला काढून देत कुटुंबाला मदत करत नालासोपा-याला पाठवून दिले.