शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:28 IST2024-12-03T14:27:29+5:302024-12-03T14:28:16+5:30
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात एक घटना घडली आहे. एका ग्रामपंचायतीने शिवीगाळ करण्यावर बंदी घातली. याचे उल्लंघन करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने आता दंड ठोठावला आहे.

शिवीगाळ करणाऱ्या दोघांना ग्रामपंचायतीने ठोठावला दंड; नेवासातील घटना, वाद काय?
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे शिवीगाळ केल्याने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची शिक्षा दोन व्यक्तींना ग्रामपंचायतीने केली आहे. शुक्रवारच्या (दि.२८ नोव्हेंबर) ग्रामसभेत शिवीगाळ केल्यास पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा ठराव झाला होता. त्यानंतर प्रथमच दोन व्यक्तींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली.
शुक्रवारी (दि.२८ नोव्हेंबर) सौंदाळा गावात ग्रामसभा झाली होती. त्यावेळी गावात शिवीगाळ बंदीचा ठराव केला होता. असे केल्यास पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्याचाही निर्णय झाला होता.
रविवारी (दि.१ डिसेंबर) सौंदाळा येथील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले. त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या.
सोमवारी (दि.२) सकाळी सरपंच शरद आरगडे हे वादाचा मुद्दा असलेल्या जागेवर गेले. तेथे जाऊन शांताराम व ठकाजी आरगडे यांना बांधावर खांब उभे करण्याचे सांगून वाद मिटविला.
यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य केले. त्यावेळी ग्रामसभेत ठरल्यानुसार शिवीगाळ केल्याने ग्रामपंचायतीचा प्रत्येकी ५०० रुपये दंड भरला.
ग्रामपंचायतीने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला दिला. बांध भाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्याची समज दिली. दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचे ठकाजी व शांताराम आरगडे यांनी कबूल केले.
दंडाच्या रकमेतून प्रबोधन करणार..
ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधीत भरणार आहे. या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे यासाठी फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचे पिसोटे यांनी सांगितले.