ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्यामुळे राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतींतर्गत कार्यरत ६० हजार कर्मचारी येत्या १९ एप्रिलपासून संपावर जाणार आहेत. या संपात राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे, उपाध्यक्ष आत्माराम घुणे, जिल्हा सचिव दिलीप डिके, राहाता तालुका अध्यक्ष राहुल पोकळे, उपाध्यक्ष शकील पठाण, कार्याध्यक्ष मधुकर घोरपडे, सचिव योगेश गोसावी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
६० हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर येथे भव्य लाँगमार्च, ७ जानेवारी २०१९ ला भव्य अधिवेशन घेतले होते. तत्कालीन राज्यमंत्री दादा भुसे यांनी अधिवेशनात मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन दिले होते, तसेच लातूर अधिवेशनात ग्रामविकासमंत्री व कामगारमंत्र्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. मात्र, अद्याप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.