ॲसिड हल्ला पीडितेचा उपचार खर्च सरकार करणार, कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 07:21 IST2026-03-19T07:20:54+5:302026-03-19T07:21:18+5:30
बुधवारी विधानसभेत या घटनेचा मुद्दा उपस्थित झाला. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष केले.

ॲसिड हल्ला पीडितेचा उपचार खर्च सरकार करणार, कायदा-सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका
मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सहावीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलेल असे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
बुधवारी विधानसभेत या घटनेचा मुद्दा उपस्थित झाला. याप्रकरणी आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात न आल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, नाना पटोले आणि अस्लम शेख यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला लक्ष केले.
आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत
ज्या तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. हा तरुण वडगावपान गावातीलच असावा, असा संशय असून आरोपीच्या शोधासाठी गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे. मुलीवर सध्या प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या उपचारांचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहितीही विखे-पाटील यांनी दिली.
प्लास्टिक सर्जरी करावी लागणार, मुंबईत आणावे
आमदार नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुली जर असुरक्षित असतील तर ती राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. अधिवेशन सुरू असताना अशी घटना घडणे हे गृहविभाग व सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.
अकरा वर्षांच्या मुलीचा चेहरा गंभीररीत्या भाजला असून तिच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून पुढे प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईतील मोठ्या रुग्णालयात तिचे उपचार करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दहा पथके
संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. अद्यापपर्यंत आरोपी उघड झालेले नाहीत, असे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हार-घोटी राज्यमार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात मागील चार वर्षांत सातशे चिमुकल्या अत्याचाराच्या बळी ठरल्या असून, चालू वर्षात मागील दोन महिन्यांत हा आकडा ४० वर पोहोचला आहे.