बहिरवाडीत कालभैरवनाथांच्या नावानं चांगभलंचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:19 IST2021-02-08T04:19:24+5:302021-02-08T04:19:24+5:30
नेवासा : पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...

बहिरवाडीत कालभैरवनाथांच्या नावानं चांगभलंचा गजर
नेवासा : पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी दिवसभर कालभैरवनाथांचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे अमृतवाहिनी प्रवरानदीच्या मध्यधारेवर असलेल्या खडकावरील श्री कालभैरवनाथांची मूर्ती वीस फूट पाण्याखाली आहे. त्यामुळे त्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरातील
श्री कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी श्री कालभैरवनाथांना जलाभिषेक करण्यात आला. तद्नंतर झालेल्या महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने सकाळपासूनच महिला, आबालवृद्धांसह अनेक भाविकांनी मंदिर परिसरात चुली पेटवून त्यावर महाप्रसाद असलेल्या डाळ रोडग्याचा प्रसाद तयार करून नैवद्य दाखवला.
प्रवरा नदीच्या पैलतीरावर असलेल्या खलालपिंपरी, देवगड, मुरमे परिसरातील भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी बोटीची व्यवस्था होती. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने काटेकाेर नियोजन केेले होते. वाहन पार्किंग व यात्रेतील दुकाने लावण्यासाठी व्यवस्था केली होती. येथील विविध तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक बनून याठिकाणी सेवाकार्य केले. यात्रेत मेवामिठाई, खेळणी, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, प्रसाद, पानफुलांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.