कोपरगावात व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:16 IST2020-06-06T14:15:17+5:302020-06-06T14:16:30+5:30
मागील वर्षी जुलै महिन्यात एका व्यापारी महिलेवर गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेराव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून अकरा महिन्यानंतर जेरबंद केले आहे.

कोपरगावात व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा फरार आरोपी जेरबंद
कोपरगाव : मागील वर्षी जुलै महिन्यात एका व्यापारी महिलेवर गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेराव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून अकरा महिन्यानंतर जेरबंद केले आहे.
आरोपी जगताप याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी शुक्रवारी दिली.
१७ जुलै २०१९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील किशोर वाईन्स या दुकानातील महिला आपल्या दिवसभराचा गल्ल्याचा हिशोब करून ती रक्कम घराकडे घेऊन चालली होती. यावेळी तिला तिच्या घराजवळ गाठून त्यांना स्कुटी बाजूला घ्या, असे म्हणून एकाने वाद घातला होता. त्यानंतर त्याने थेट या महिलेवर आपल्या उजव्या हातात असलेले पिस्तुल रोखून धरले होते. मात्र या महिलेने सावधानता दाखवल्याने हवेत गोळीबार झाला. यामुळे या महिलेचे प्राण वाचले होते.
या घटनेनंतर सदर आरोपी फरार झाला होता. दरम्यान आरोपी हा कोपरगावातील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी अक्षय खंडेराव जगताप यास जेरबंद केले आहे. मात्र त्याचा एक साथीदार अजूनही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.