खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचे समान वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:12+5:302021-04-19T04:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: कोरोनाबाधित रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा रविवारी काहीअंशी कमी ...

खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचे समान वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: कोरोनाबाधित रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा रविवारी काहीअंशी कमी झाला असून, सोमवारपासून खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचे समान वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात सर्वच खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. जिल्ह्याला दररोज ५० ते ६० टन ऑक्सिजनची गरज आहे, परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, शनिवारी रात्री उशिराने ऑक्सिजनचे दोन टँकर आले होते. त्यामुळे ३४ टन ऑक्सिजन नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले. रविवारी सकाळी पुन्हा १० टन क्षमतेचा एक टँकर दाखल झाला असून, मागील २४ तासांत ४४ टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे.यापैकी १५ टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयास देण्यात आले असून, उर्वरित २९ टन ऑक्सिजन खासगी रुग्णालयांना वितरित करण्यात आले आहे.
ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने खासगी रुग्णालयांना मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नव्हते. मनमानीपणे ऑक्सिजनचे वाटप सुरू होते. ऑक्सिजन वाटपावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागणीनुसार रुग्णालयांना ऑक्सिजनचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी रुग्णालयांना सकाळी १० वाजेपर्यंत ऑक्सिजनची मागणी ऑनलाईन नोंदविण्याचा आदेश देण्यात आला आहे. मागणीच्या प्रमाणात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
....
अशी आहे ऑक्सिजनची मागणी
शासकीय रुग्णालये- १५ टन प्रतिदिन
खासगी रुग्णालये-४५ टन प्रतिदिन
....
- ऑक्सिजनची निर्माण झालेली तूट कमी होत असून, शनिवारी रात्री ३४ तर रविवारी सकाळी १० टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. ऑक्सिजनचा तुटवडा काही अंशी कमी झाला आहे.
- संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी
...
एमआयडीसीतील बंद पडलेला प्लांट होणार सुरू
नागापूर औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेला ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट सोमवारी सुरू होणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी दिवसाला ५ ऑक्सिजन उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले.