अभियंत्यांचे अपहरण करून बेदम मारहाण
By Admin | Updated: July 17, 2014 00:29 IST2014-07-16T23:12:48+5:302014-07-17T00:29:10+5:30
अहमदनगर: जमिनीच्या व्यवहारातून अपप्रचार केल्याचे सांगत डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून एका तरुण अभियंत्याचे पाच जणांनी अपहरण केले.

अभियंत्यांचे अपहरण करून बेदम मारहाण
अहमदनगर: जमिनीच्या व्यवहारातून अपप्रचार केल्याचे सांगत डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून एका तरुण अभियंत्याचे पाच जणांनी अपहरण केले. त्याला मालकाच्या कार्यालयात आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सावेडी भागातील गुलमोहोर रोडवर ९ जुलै रोजी घडली. या घटनेतून सहीसलामत सुटल्यानंतर अभियंत्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तोफखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गुलमोहोर रोड परिसरात राहत असलेले अभियंता प्रविण शर्मा यांचे रिद्धी सिद्धी कॉलनीमध्ये कार्यालय आहे. शर्मा यांचा कारचालक अशोक सुदाम खिळे, कार्यालयातील गोरख सुखदेव खळे, आप्पा कुलकर्णी, विशाल बोरवे यांनी अभियंता राहुल शैलेंद्रकुमार नायक (वय ३०, गुलमोहोर रोड) यांना त्यांच्या घरी जाऊन आधी दमदाटी केली. आमचे बॉस असलेले प्रवीण शर्मा हे शेतकऱ़्यांचे पैसे देत नाही, असा अपप्रचार का करता? असा जाब विचारत नायक यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली. तसेच शिविगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. नायक यांना दुचाकीवर बसवून बळजबरीने त्यांनी प्रवीण शर्मा याच्या कार्यालयात आणले.
तेथे पाच जणांनी नायक यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारातून सहीसलामत सुटल्यानंतर नायक यांनी मंगळवारी (दि.१५) फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी गोरख सुखदेव खळे (वय २१, रा. देवगाव, ता. नगर) याला अटक केली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एन. आर. प्रधान यांनी २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)