अहमदनगर : जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी दररोज चार टँकर ऑक्सिजनची गरज असताना सध्या फक्त दोन ते तीन टँकर येत आहेत. ऑक्सिजन पूर्ण क्षमतेने मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवेतील ऑक्सिजन रूग्णांना देण्यासाठीची यंत्रणा जिल्हा रूग्णालयात बसविण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात हा प्रयोग सुरू होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.
आमदार पवार यांनी शनिवारी नगर शहरातील आठ ते दहा खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात जावून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रूग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री, प्रशासन लक्ष ठेवून आहेत. जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, खासगी रूग्णालयांना सध्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. याचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रशासन, शासन लक्ष ठेवून आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांची बैठक झाली. जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ऑक्सिजनची कमतरता भासत असून, तो पुरवठा कसा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोरोनाचे स्वरुप बदलले आहे. कोरोनाचा चार दिवसातच फुफ्फुसात शिरकाव होतो. न्युमोनिया होतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे जाणवताच चाचणी करून घ्यावी. डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांचाच रेमडेसिविर इंजेक्शन वापण्याबाबत डॉक्टरांवर दबाव असतो. त्यामुळे गरज असेल तरच त्याचा वापर झाला पाहिजे. रेमडेसिविरपेक्षाही सध्या ऑक्सिजनची मोठी गरज आहे. रेमडेसिविरची निर्मिती होईल, मात्र ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी वेळ लागणार आहे. रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणे ही सध्या तारेवरची कसरत आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. सध्या उपलब्ध उपचार क्षमता आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यात मोठी तफावत आहे. यात यंत्रणा कमी पडत असली, तरी सर्वजण काम करत आहेत. राजकारण सोडून माणुसकी म्हणून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे.
--
मस्ती करणाऱ्यांवर कारवाई करा
निर्बंध लावले असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. अशाही परिस्थितीत लोक बेजबाबदारपणे बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. परंतु, जे गरीब लोक पोट भरण्यासाठी बाहेर पडतात, त्यांच्यावरील कारवाईबाबत प्रशासनाने संवेदनशील असावे, असे पवार म्हणाले.
--------