जिल्हाधिकाऱ्यांचे मिशन पाणी बचाव

By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-18T23:20:31+5:302014-07-19T00:35:32+5:30

अहमदनगर: जुलै अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही़ त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, नगर दक्षिणसाठी कुकडीच्या मृतसाठ्यातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे़

District Collector's Water Rescue | जिल्हाधिकाऱ्यांचे मिशन पाणी बचाव

जिल्हाधिकाऱ्यांचे मिशन पाणी बचाव

अहमदनगर: जुलै अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही़ त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, नगर दक्षिणसाठी कुकडीच्या मृतसाठ्यातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे़ सध्या भंडारदरा व मुळात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे़ मात्र पावसाला जोर नसल्याने येणाऱ्या पाण्याचा लोंढा ओसरू लागल्याने आणि आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने कसा वापर करता येईल,याचे नियोजन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले़
जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे ढग गडद झाले असून, प्रशासकीय यंत्रणाही धास्तावली आहे़ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंत्रालयातही बैठकांनी वेग घेतला आहे़ पिंपळगाव जोगा धरणातून नगर जिल्ह्यासाठी ४८६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी करण्यात आली आहे़ यासंदर्भात नुकतीच मंत्रालयात बैठक झाली़ या बैठकीत पिंपळगाव जोगा धरणात ३ टीएमसी मृत पाणीसाठा शिल्लक असल्याचे उघड झाले आहे़ मृतसाठ्यातील पाणी वाटपाचे अधिकार जलसंपदा खात्यास असतात़ त्यामुळे कुकडीच्या पाण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला असून, याविषयी येत्या एक दोन दिवसांत निर्णय होऊन पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत साठी पाणी सोडण्यात येईल, असे कवडे यांनी सांगितले़ जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत माहिती देताना कवडे म्हणाले, भंडारदरा व मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे़ त्यामुळे दोन्ही धरणातील पाणी पातळीत काहीअंशी सुधारणा झाली आहे़ परंतु ती समाधानकारक नाही़ जिल्ह्यातही पाऊस पडला नाही़ त्यामुळे चिंता वाढली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याची काटकसर कशी करता येईल, यावर भर देण्यात येत असून, नियोजनाचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे जिल्ह्यात पाणी कपातीची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)
कुकडीतून असे येणार पाणी
पिंपळगाव जोगा धरणातून येडगाव धरणात पाणी येईल़ हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा येथे पाणी येणार आहे़हे पाणी येण्यास किमान दहा दिवस लागतील़
पिंपळगाव जोगाने गाठला तळ
कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरणात ३ टीएमसी मृत पाणीसाठा शिल्लक आहे़ मृतसाठ्यातून जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जतसाठी पाणी सोडण्यात येणार आहे़ मात्र या धरणातून नगर जिल्ह्यासाठी किती पाणी मिळते, त्यावरच पुढील नियोजन अवलंबून असणार आहे़
मुळा धरणात आवक
मुळा धरणात ४९० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे़ या धरणात नवीन ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे़ त्यामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे़ मात्र पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्यामुळे आवक कमी झाली आहे़ पाऊस न पडल्याने नेवासा तालुक्यातील सोनई, भेंडा, कुकाणासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे़
भंडारदरा धरणातून पाणी सोडले
भंडारदरात एक हजार ५८६ दशलक्ष घनफूट एकूण पाणीसाठा आहे़ तर निळवंडेत ३७३ दशलक्ष घनफूट एकूण पाणीसाठा आहे़ त्यातून श्रीरामपूर, बेलापूर आणि संगमनेरसाठी ५९० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले आहे़

Web Title: District Collector's Water Rescue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.