अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 23:35 IST2025-07-27T23:34:12+5:302025-07-27T23:35:38+5:30
अहिल्यानगर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.

अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
अहिल्यानगर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून ५ व राज्य शासनाकडून १० असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी (दि.२७) उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. पवार म्हणाले की, "देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. आज येथे उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याचा व विचारांचा खऱ्या अर्थाने गौरव आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल. देशाचे संविधान बदलले जाईल, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र, सूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलेले जाणार नाही. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान डॉ. आंबेडकरांनी भारताला दिले. त्यांनी गरीब, वंचित व शोषित घटकांना समानतेचा हक्क बहाल केला. यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे."
या अनावरण सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बोधी आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, मार्केट यार्ड येथे साकार होत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला कधीही धक्का लागणार नाही, ते चिरकाल टिकणारे आहे. अहिल्यानगर येथे संविधान भवन उभे राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. प्रास्ताविकात आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले.
आनंद शिंदे यांच्या भीमगीताने श्रोते मंत्रमुग्ध
कार्यक्रमापूर्वी गायक आनंद शिंदे यांच्या संगीत पथकाने आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम सादर केला. याप्रंसगी शिंदे यांनी सादर केलेल्या एक से बढकर एक गीतांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. जय भीमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
असा आहे महामानवाचा पुतळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक हे नवी दिल्ली येथील नव्या संसद भवन अर्थात सेंट्रल व्हिस्टा या वास्तूच्या प्रेरणेने साकारण्यात आले आहे. येथील स्मारकात १५ फूट उंचीचा चौथरा असून त्यावर १० फूट उंचीचा डॉ. आंबेडकर यांचा कास्य धातूपासून साकारलेला पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे एकूण वजन ९५० किलोग्रॅम आहे. पुतळ्याच्या मागील भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी एलईडी स्वरूपात उभारण्यात आली आहे, तसेच साक्षरतेचे प्रतीक म्हणून लेखणीचे शिल्प पुतळ्याच्या समोरच्या बाजूस स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या धर्तीवर हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी रुपये १६ लाख ७९ हजार इतका खर्च आला आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६६ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.