आर्थिक निकषावरील आरक्षणाचा संपूर्ण फायदा मुस्लिमांनाः प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:10 IST2019-01-14T16:09:36+5:302019-01-14T16:10:53+5:30
भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात फार सख्य आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते याची राष्ट्रवादी वाट पहात आहे.

आर्थिक निकषावरील आरक्षणाचा संपूर्ण फायदा मुस्लिमांनाः प्रकाश आंबेडकर
अहमदनगर : आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे, असं मत मांडत, हे आरक्षण मोदी सरकारसाठीच त्रासाचं ठरेल, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या आरक्षणासाठी जे निकष ठेवले आहेत, त्यात बहुतांश मुस्लिम कुटुंब येतात. त्यामुळे भाजपा वरून भगवी आणि आतून हिरवी आहे, असा प्रचार आता चाललेला आहे. हे सरकार हिंदूंचं की मुस्लिमांचं असा प्रश्न विचारला जातोय. त्याला हे तोंड देऊ शकत नाहीत. आम्ही मात्र आनंदी आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचवेळी, मोदी सरकारने आर्थिक निकषावर दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल असे वाटत नाही, असं मतही त्यांनी मांडलं.
राष्ट्रवादी नेहमी फांद्या तोडण्याचे काम करते. मुळावर कारवाई करीत नाही. कारवाई करायची होती तर व्हीपप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती. भीमा-कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यांच्यावरही कारवाई केली नाही. नगरसेवकांवरील कारवाई फक्त दिखावा आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात फार सख्य आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते याची राष्ट्रवादी वाट पहात आहे. शरद पवार धर्मनिरपेक्ष असतील मात्र त्यांचा पक्ष नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर म्हणाले, येणाऱ्या लोकसभेत आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. त्यावर दोन्ही काँग्रेसचे उत्तर आलेले नाही. मात्र आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. आघाडी झाली नाही तर पक्ष महाराष्ट्रातील ४८ जागा लढविणार आहे.