भाजपाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 00:37 IST2018-12-09T00:35:37+5:302018-12-09T00:37:14+5:30
दिवसभरात हल्ल्याच्या दोन घटना

भाजपाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला
अहमदनगर: शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर सायंकाळी हल्ला झाल्यानंतर भाजपचा कार्यकर्ता व सराईत गुन्हेगार विजय रासकर याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील सारसनगर येथे घडली. या हल्ल्यात मयूर राऊत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राऊत हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. रासकर आणि राऊत याच्यात जुने वाद आहेत.
शनिवारी रात्री सारसनगर येथे राऊत आणि रासकर हे समोरासमोर आले, तेव्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी रासकर याने राऊत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राऊत याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेनंतर विजय रासकर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भिंगारकॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. रासकर याच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो भाजप आमदाराचा कार्यकर्ता आहे. सायंकाळी कापड बाजारात सागर थोरात या शिवसैनिकावर हल्ला झाला. हा हल्ला भाजप खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र यांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.