किरकोळ विक्रेत्यांना बंदी तरीही बाजार समितीत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:22 IST2021-04-07T04:22:26+5:302021-04-07T04:22:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : येथील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली ...

किरकोळ विक्रेत्यांना बंदी तरीही बाजार समितीत गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु, तरीही बाजार समिती आवारात गर्दी होत आहे. त्यामुळे नियमांचे कडक पालन करा, अन्यथा बाजार समिती बंद करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त गोरे यांनी कै. दादा पाटील शेळके कृृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व फळविक्रेत्यांच्या संघटनेची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत बाजार समिती आवारात होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्याबाबत चर्चा झाली. यावेळी बाजार समितीत सामाजिक अंतर ठेवून भाजीपाला व फळांची खरेदी- विक्री करण्याच्या सूचना गोरे यांनी केल्या. यापुढे गर्दी झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजार समितीतील खरेदी-विक्री बंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार बाजार समितीने स्वत:हून किरकोळ विक्रेत्यांना बाजार समितीत बंदी घातली आहे. गेल्या आठ दिवसांपासून किरकोळ विक्रेत्यांना बसू दिले जात नाही, असे बाजार समितीचे म्हणणे आहे. किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातल्यानंतरही बाजार समिती आवारात गर्दी होत आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका व बाजार समितीकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
....
शहरातील भाजी विक्रेत्यांना ६ फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना
शहरात ठिकठिकाणी भाजी विक्रेते पथारी टाकून बसतात. त्यामुळे गर्दी होताना दिसत आहे. भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी शहरातील ११ ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. दोन विक्रेत्यांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
..
०६ महापालिका