अहमदनगर : कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका व विविध सामाजिक संस्थांनी कोविड केअर सेंटर्स सुरू केले आहेत. मात्र या सेंटर्समधील निम्म्याहून अधिक बेड्स रिकामे आहेत. मात्र, दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. तेथे बेड मिळवण्यासाठी रुग्णांना वेटिंग करावे लागत आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची सोय व्हावी, यासाठी शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर्स सुरू होत आहेत. नगरमध्ये महापालिका प्रशासन व विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. या सेंटर्समध्ये १ हजार २०० बेड्सची सुविधा आहे. यापैकी ८०० बेड्स सध्या रिकामे आहेत. शहरातील रुग्णसंख्या वाढत असतानाच कोविड केअर सेंटर्समधील बेड्स मात्र रिकामेच आहेत. लाखो रुपये खर्च करून रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर्स उभारले गेले. परंतु, तिथे रुग्ण दाखल हाेताना दिसत नाही. कोविड केअर सेंटरमध्ये न जाता घरीच उपचार घेण्यावर रुग्णांचा भर आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभे केलेले कोविड केअर सेंटर्स रिकामे असून, काही ठिकाणी तर बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण दाखल झालेले आहेत. आरोग्य सुविधांसह राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा उपलब्ध असूनही रुग्ण येत नसल्याने प्रशासनाचा नाइलाज झाला आहे.
नगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज ८०० हून अधिक नव्या रुग्णांची भर पडते. यापैकी ८० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असतात. उर्वरित २० टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असतात. त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासते. परंतु, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागते. त्यामुळे ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर रहावे लागत आहे. केवळ कोविड केअर सेंटर उभे करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्याची गरज आहे.
....
ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा
नगरमध्ये महापालिकेने ६६ खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी दिलेली आहे. या रुग्णालयांमध्ये २ हजार १८० बेड्सची सोय आहे. हे सर्व बेड्स फुल्ल असून, ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.
...
कोविड रुग्णालयांतील बेड
ऑक्सिजन- ८००
व्हेंटिलेटर-१८०
आसीयू बेड- ५००
............
कोविड सेंटरची स्थिती
कोविड केअर सेंटर - ९
एकूण बेड - १२००
रिकामे बेड - ८००