...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 13:47 IST2020-03-16T13:06:05+5:302020-03-16T13:47:11+5:30
सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे.

...जेव्हा कॅबिनेट मंत्र्याचा भाचाच म्हणतो, “ठाकरे सरकारला जाग येणार का?”
अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. तर याच घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्यानंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाला त्यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक इशू सिंधू हे लंडनला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी गेल्याने नगरचे पोलिस अधीक्षकपद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त झाले आहे. सध्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे या पदाचा कारभार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णवेळ पोलीस अधीक्षक देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळाले.
तर याच मुद्यावरून सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडी सरकाराला घराचा आहेर दिला आहे. तांबे यांनी ट्वीट करत म्हंटलं आहे की, अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्याला गेले ३ महिने पूर्णवेळ पोलिस अधिक्षक नाहीत. त्यामुळे आता शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण ?
भोजडे गावात रविवारी शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे यांच्यावर चारचाकी वाहनातून येऊन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात गिरे हे जागीच ठार झाले. तर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तत्काळ त्याच गाडीतून पसार झाले. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.