‘सर्कस’ आहे, पण आमच्याकडे ‘जोकर’ नाहीत-हसन मुश्रिफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 14:20 IST2020-06-10T14:19:52+5:302020-06-10T14:20:47+5:30
आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला.

‘सर्कस’ आहे, पण आमच्याकडे ‘जोकर’ नाहीत-हसन मुश्रिफ
अहमदनगर : आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला.
कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी महाराष्ट्राचे सरकार हे सरकार की सर्कस? याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुश्रिफ म्हणाले, सरकारमध्ये समन्वय असून कोरोना रोखण्यासाठी सरकारला यश आलेले आहे. नगर जिल्हा एक जूनला कोरोनामुक्त होईल, असे आपण म्हणालो होतो, मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. प्रशासन चांगले काम करीत आहे, मात्र या कामाला दृष्ट लागली आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल. याबाबत आता मुहूर्त काही देणार नाही, असे मुश्रिफ यांनी स्पष्ट केले.
पीक कर्जाबाबत जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांना आदेश दिले असून आता शेतक-यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही, याबाबत आदेश दिले आहेत. कोविड-१९मुळे सरकारही आर्थिक संकटात होते, त्यामुळे कर्जमाफीचे पैसे बँकांकडे आले नाहीत. मात्र शेतक-यांची आधीची कर्जाची रक्कम सरकारच्या नावे दाखवा, मात्र खरिप पिकांसाठी शेतकºयांना कर्ज देण्यासाठी अडवू नका, असेही बँकांना बजावण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. गतवर्षीच्या पावसाच्या स्थितीमुळे सोयाबीनचे उत्पादन न झाल्याने यावर्षी बियाणांची टंचाई आहे. मात्र शेतक-यांनी घरातले सोयाबीन वापरून टंचाईवर मात करावी. खते आणि बियाणांची जिल्ह्यात टंचाई नसल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेशन दुकानदारांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धान्य वाटपातही आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री हा नशिबाचा खेळ
मुख्यमंत्री होणे हा नशिबाचा खेळ आहे. पंधरा वर्षांपूर्वी मी मंत्री होतो, त्यावेळी देवेंद्र फडवणीस कोणीही नव्हते. ते मुख्यमंत्री झाले, असे पालकमंत्र्यांनी सांगताच, तुमच्या पक्षात तुम्हाला कोणी होऊ दिले नाही का? असे पत्रकारांनी त्यांना विचारताच ते म्हणाले, मुख्यमंत्री होणे हा नशिबाचा खेळ असतो.