कोपरगाव : बनावट ओळखपत्राच्या आधारे सीआयडी व लाचलुचपत खात्याचा अधिकारी असल्याचे भासवून एका इसमाकडून १ हजार रूपये उकळणाऱ्यास ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना तालुक्यातील मायगाव देवी येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तोतयास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशील सोमनाथ पवार (वय २७, रा. सावळीविहीर) हा बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मायगाव देवी येथील दिपक सुर्यभान शेलार यांच्या घरी गेला. बनावट ओळखपत्राच्या आधारे सीआयडी व लाचलुचपत खात्याचा अधिकारी असल्याचे भासविले. विना परवाना बेकायदा मद्य विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे, असे सांगून शेलार यांच्याकडून एक हजार रुपये घेतले. परंतू पवार याच्या ओळखपत्राचा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्यास पकडून थेट तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी झडती घेतली असता दोन्ही ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून बजाज डिस्कव्हर दुचाकी, सॅमसंग कंपनीचे २ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. पवार याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पी.बी.काशीद करीत आहेत. (प्रतिनिधी)
सीआयडी अधिकारी भासवून पैसे उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 23:24 IST