अहमदनगर : देशात लोकशाही रूढ होऊन सत्तर वर्षे उलटली. तरीही स्रिया सुरक्षित नाहीत. स्वराज्यात स्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत होती. रांझेच्या पाटील आणि सखूजी गायकवाड यांच्या घटना महाराजांच्या न्यायप्रियतेची साक्ष देतात. लोकशाहीची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली, असे मत कॉ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी व्यक्त केले.
वाहिरा (ता. आष्टी) येथे श्री संतशिरोमणी शेख महमंद महाराज प्रतिष्ठान व वाहिरा ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून लोकजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सचिन चोभे, उपसरपंच सतीश आटोळे, श्री संतशिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धनाथ मेटे महाराज, महादेव गवळी, संदीप गांगर्डे, फक्कड झांजे, मोसीम महाराज शेख आदी उपस्थित होते.
सय्यद म्हणाले, छत्रपती शिवराय कृषी धोरणांबाबत जागरूक होते. त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केले. आपत्तीच्या काळात करमाफी केली. सैनिकांकरवी शेतकऱ्यांची लूट होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. शिवकालीन पत्रांत शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका, असा इशारा महाराजांनी दिल्याचा उल्लेख सापडतो. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेल्या शासकांना महाराजांच्या विचारांचा विसर पडला असल्याची टीका करत सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रास्ताविक मेटे महाराज यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण आटोळे यांनी केले. आभार सतीश चंदिले यांनी मानले. तीनदिवसीय शिवजयंती कार्यक्रमासाठी सतीशराव आटोळे, अंबादास झांजे, नितीन झांजे, गंगाधर चंदिल आदींनी परिश्रम घेतले.
२२ शिवजयंती