NCP Chhagan Bhujbal: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी इथं दोन दिवसीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ हे नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र अखेर आता भुजबळ हे या शिबिरासाठी दाखल झाले असून मंत्रिपद नाकारण्यात आल्यानंतर ते पहिल्यांदाच अजित पवार यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणार आहेत.
'दिशा विकासाची, पुरोगामी विचाराची' हे ब्रीद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साईनगरीत दोनदिवसीय नवसंकल्प शिबिर होत आहे. विधानसभेतील यशानंतर आता पुढील वर्षात व आगामी पाच वर्षांत पक्ष संघटन मजबूत करणे, पक्षात शिस्त आणणे, नवे संकल्प निश्चित करणे, त्या संदर्भात पक्षाचे, विकासाचे धोरण ठरवण्यासाठी या शिबिरात विचारमंथन करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. भुजबळांची नाराजी आणि वेट अँड वॉच
नागपूरमधील राजभवनात १५ डिसेंबरला भाजपसह शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली होती. मात्र, त्यात भुजबळ यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्या दिवसापासूनच भुजबळ समर्थकांकडून रोष व्यक्त करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर भुजबळ यांचे नाराजीनाट्य, समता परिषद मेळावा अशा घटना घडत गेल्या. तरीदेखील अजित पवार, प्रफल्ल पटेल किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि पक्षातील दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बैठकीबरोबरच बुधवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्याचा अर्थ भुजबळ 'वेट ॲन्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याची चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या संकल्प शिबिराला उपस्थित राहिलेले छगन भुजबळ व्यासपीठावरून काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.