साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:31 IST2025-10-19T12:30:36+5:302025-10-19T12:31:13+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : साई संस्थानच्या विद्युत विभागामध्ये ७७ लाख १४ हजार रुपयांच्या साहित्याचा अपहार झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शिर्डी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी संस्थानच्या ४७ विद्यमान, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संजय काळे (कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा अपहार २०१७ ते २०२३ या कालावधीत झाला आहे. संस्थानच्या विद्युत विभागातील डेड स्टॉक रजिस्टरमध्ये बनावट नोंदी करून आणि साहित्याची नोंद न ठेवता आरोपींनी संगनमताने ही चोरी केली. यापूर्वी २३ मे २०२२ रोजी केवळ २२,५०० रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत सांगितले की, संस्थानच्या विद्युत विभागात सन २०१७ ते २०२३ दरम्यान सुमारे ५१.६२ लाखांच्या साहित्याची अनियमितता झाल्याचे शासनमान्य लेखा परीक्षणात स्पष्ट झाले.