मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:53 IST2025-03-27T13:52:53+5:302025-03-27T13:53:21+5:30
साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते.

मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत
Shirdi Sai Baba Mandir: पत्नीच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून तिला शिर्डी संस्थानच्या दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आला. शिर्डीत साई दरबारी सापडलेले चौदा हजारांच्या नोटांचे बंडल यत्किंचितही लोभ न धरता संस्थानात जमा केले. स्वतः संकटात असलेल्या या गरीब भाविकाने घडविलेल्या माणुसकीच्या श्रीमंतीचे दर्शन चर्चेचा विषय बनले आहे.
जालना जिल्ह्यातील केंदली येथील रहिवासी गजानन सव्वाराव म्हस्के, एक अपंग व्यक्ती, ज्यांचे जीवन मोलमजुरी करून चालते. पैशांची चणचण असल्याने, पत्नीच्या उपचारासाठी ते शिर्डीच्या संस्थान रुग्णालयात आले. पत्नीच्या पोटाच्या आजारावर उपचार सुरू असताना, साईबाबांचे दर्शन घेऊन द्वारकामाई मंदिरातून बाहेर पडताना त्यांना सापडलेले १४ हजार रुपयांचे बंडल त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सोपवले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे नेले.
योगायोगाने, माजी नगराध्यक्ष नीलेश कोते आणि श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष दीपक वारुळे हे माळी यांच्याकडे उपस्थित होते. गजानन यांची परिस्थिती जाणून, सर्वांना त्यांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आला. साईबाबांच्या शिकवणीची साक्ष देणारी ही घटना, आजही जगात माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती देते.
गजाननचे केले कौतुक
'गरिबी अव्वल बादशाही, अमीरीसे लाख सवाई' हे साईबाबांचे शब्द गजानन यांच्या कृतीतून पुन्हा एकदा खरे ठरले. या घटनेने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन भरून आले. माजी नगराध्यक्ष नीलेश कोते आणि श्रीरामनवमी यात्रा समितीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांनी गजानन यांचा सत्कार करत त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.