छिंदम प्रकरणावरुन उपमहापौर निवडणुकीत भाजपने काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 13:15 IST2018-03-01T13:03:52+5:302018-03-01T13:15:59+5:30
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

छिंदम प्रकरणावरुन उपमहापौर निवडणुकीत भाजपने काढला पळ
अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपमहपौर निवडण्यासाठी सोमवारी ५ मार्च उपमहापौर निवडणूक होत आहे. यात श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याचे प्रायश्चित्त म्हणून भारतीय जनता पार्टी उपमहापौर पदासाठी उमेदवार उभा करणार नाही. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी आणि शहर जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत मुंबईत हा निर्णय घेण्यात आला.
उपमहापौर पदासाठी आज, गुरुवारी (दि. १) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे गट नेते समदखान यांनी उपमहापौर पदाचा अर्ज घेतला आहे. तर सेनेच्या दीपाली बारस्कर यांनीही अर्ज घेतला आहे. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर शिवसेनेने उपमहापौरपद मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, डॉ. सागर बोरुडे या तिघांनी अर्ज घेतले आहेत.