भाजपने चौंडीला राजकीय व्यासपीठ बनविले : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:57 IST2018-07-12T19:46:22+5:302018-07-12T19:57:02+5:30
सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे

भाजपने चौंडीला राजकीय व्यासपीठ बनविले : प्रकाश आंबेडकर
जामखेड : धनगर समाजाच्या आरक्षण मागणीचे केंद्र चौंडी आहे. सत्ताधाऱ्यांनी ते जाणीवपूर्वक राजकीय व्यासपीठ केले आहे. त्यामुळे तेथे आरक्षण, घोषणा या दोन्ही गोष्टी घडणार आहेत. हे सर्व होणार हे मंत्री महोदयांनी (राम शिंदे) गृहीत धरले होते. डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी उचलून गाडीत घातले हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. उच्च न्यायालयात भिसे यांच्या जामिनासाठी स्वतंत्र वकील देऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमातील गोंधळ प्रकरणी जामखेड कारागृहात असलेले बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांची आंबेडकर यांनी गुरुवारी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले, ८५ हजार आदिवासी बांधव जातपडताळणी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. यामध्ये धनगर समाजही आहे. म्हणून यासर्व वंचित आदिवासी संघटनांचा लढा राज्याबाहेर चालू आहे. याबाबत द्विधा मनस्थितीत सरकार आहे.
संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचाराविषयी बोलतांना आंबेडकर म्हणाले, भिडे यांनी संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे म्हटले. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. याविषयी मुख्यमंत्र्यांचे विधानही गोलमाल आहे. आम्ही भिडे यांच्या विधानाशी सहमत नाही एवढे बोलून चालत नाही. ते स्वत: व्यक्तिगत मनुवादींपेक्षा संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांना महत्त्व देत असतील. या प्रकरणात ते भिडेंना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.