भीमा कोरेगाव प्रकरण : शाळा सुटली, पण दोन दिवसांपासून चिमुकली घरीच नाही परतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:44 IST2018-01-03T15:44:04+5:302018-01-03T16:44:37+5:30
खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं. त्यानुसार स्कूल बसने दुपारी दोन वाजता

भीमा कोरेगाव प्रकरण : शाळा सुटली, पण दोन दिवसांपासून चिमुकली घरीच नाही परतली
अहमदनगर - भीमा-कोरेगाव घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू असून यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी शाळा लवकर सोडण्यात आल्या. पण श्रीरामपूरमधल्या शाळेतील आठ वर्षाची चिमुकली मुलगी कालपासून घरीच परतली नाही. तणाव असल्यामुळं काल शाळा लवकर सोडण्यात आली मात्र ती शाळेतून घरी न येता 2:45 वाजल्यापासून हरवली आहे. श्रीरामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं. त्यानुसार स्कूल बसने दुपारी दोन वाजता खानापूर इथे तिला सोडलं. पण 24 तास उलटूनही मुलगी घरी पोहोचलीच नाही, कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान, तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथे मॉडेल इंग्लिश स्कुल येथे शिकणारी चिमुकली शाळेच्या बसने खानापूर येथे नेहमीच्या थांब्यावर उतरली. तिचे घर गावापासून एक किमी अंतरावर होते. एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरुन तिला पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील अमोल बाबासाहेब आदिक यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, पनवेल येथे मुलीचा शोध लागल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.