इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:49 IST2025-12-18T15:48:57+5:302025-12-18T15:49:49+5:30
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. नीरजला गंभीर जखमी झाल्यानंतर मुलांनी पळ काढला.

इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
साईनगरी शिर्डीत बुधवारी दुपारी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. इन्स्टाग्रामवरील मैत्रीच्या वादातून हा प्रकार घडला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नीरज संजू चौधरी (वय १७, रा. श्रीकृष्णनगर), असे जखमी तरुणाचे नाव आहे.
नीरज चौधरी हा बुधवारी दुपारी आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन दुचाकीवरून २०० रूम परिसरातील गार्डन शेजारच्या रस्त्याने जात होता. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या सुमित गुंजाळ, रोहित कोळगे आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी नीरजची गाडी अडविली.
नीरजला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सुमित गुंजाळ याने आपल्याजवळील चॉपर काढून नीरजच्या कमरेवर आणि किडनीवर ताकदीने वार केले. बेदम मारहाण केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नीरजला सोडून आरोपींनी घटना स्थळावरून पलायन केले.
घटनेनंतर जखमी नीरजला तातडीने साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी नीरज आणि आरोपी यांची संगमनेर येथील तीन मुलींशी इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली होती. याच ओळखीच्या वादातून १५ दिवसांपूर्वीही आरोपींनी नीरजला धमकी दिली होती. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.