रुग्ण वाढले तरी बेड कमी पडणार नाहीत; शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 15:09 IST2020-07-18T15:08:44+5:302020-07-18T15:09:14+5:30
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंता असली तरी कोणत्याही रुग्णाला बेड नाही म्हणून उपचार नाकारले, असे कदापिही होणार नाही. रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, याकडे लक्ष असून साडेसातशेपेक्षा जास्त बेडची नगर शहरात व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

रुग्ण वाढले तरी बेड कमी पडणार नाहीत; शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांची माहिती
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंता असली तरी कोणत्याही रुग्णाला बेड नाही म्हणून उपचार नाकारले, असे कदापिही होणार नाही. रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, याकडे लक्ष असून साडेसातशेपेक्षा जास्त बेडची नगर शहरात व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता डॉ. मुरंबीकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, बूथ हॉस्पिटलमध्ये ११०, जिल्हा रुग्णालयात ४००, शिवाय ११० बेड हे आॅक्सिजनची सुविधा असलेले आहेत. दीपक हॉस्पिटलमध्ये ५०, तर एम्स हॉस्पिटलमध्ये २५ बेडची सुविधा आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीमध्ये आणखी ७१ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये २५ डेडीकेटेड कोविड सेंटर (डीसीसी) आणि २२ कोविड केअर सेंटर (सीसीसी)ची सुविधा असून तिथेही प्रत्येकी १०० जणांच्या उपचाराची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही, असे डॉ. मुरंबीकर म्हणाले. याशिवाय मिल्ट्री हॉस्पिटलमध्येही रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आलेली आहे.
दहा दिवसानंतर बरा होतो
रुग्णसुरवातीच्या काळात एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याला १४ दिवस पूर्ण हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन केले जात होते. आता मात्र त्याला दहा दिवसच रुग्णालयात ठेवले जाते. व्यक्तीचे स्वॅब घेतल्यापासून दहा दिवसच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवले जाते. त्यामुळे स्वॅब घेतल्यानंतर दुस-या किंवा तिस-या दिवशी रुग्णाला पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाल्यास तो पुढे सहा ते सात दिवसच रुग्णालयात राहतो. त्यामुळे रुग्णाला लवकर सोडले जाते, हा गैरसमज आहे, असे डॉ.मुरंबीकर यांनी स्पष्ट केले.