अहमदनगरच्या नामांत्तरासाठी अनेकांचे प्रयत्न; एका व्यक्तीने, पक्षाने श्रेय घेऊ नये- रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 18:46 IST2023-06-02T18:46:09+5:302023-06-02T18:46:36+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा केली आहे.

अहमदनगरच्या नामांत्तरासाठी अनेकांचे प्रयत्न; एका व्यक्तीने, पक्षाने श्रेय घेऊ नये- रोहित पवार
अहमदनगर: काही महिन्यांपूर्वीच औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आली. त्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर/अहिल्यादेवीनगर केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड), या त्यांच्या जन्मगावी मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरच्या नामांत्तराची घोषणा केली. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, या नामांतराचे श्रेय कोण्या एका व्यक्तीने किंवा पक्षाने घेऊ नये. याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. नामांतराचे श्रेय हे जनतेचे आहे, असं रोहित पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या गोष्टीचे स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक भेदभाव न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केले आहे. त्यांचा जन्म चौंडी या ठिकाणी झाला. जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिलं असेल तर त्याचे स्वागत आहे, असंही ते म्हणाले.