सुधीर लंके
अहिल्यानगर : मुख्यमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या सभेत 'सुजय दादा-संग्राम दादा' असा खास उल्लेख केला होता. हे गणितच या निवडणुकीत जिंकले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत न घेता शिंदेसेनेला सोबत घेण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण, विखे-जगताप यांनी आपली मैत्री व युती तुटू दिली नाही. परिणामी शिंदेसेना सत्तेबाहेर राहिली आणि विरोधक मैदानाबाहेर फेकले गेले.
या निवडणुकीने शहरावर माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी पकड मजबूत केली आहे. विखे खासदार असतानाच त्यांचे व जगताप यांचे सूर जुळले होते. पुढे हे नाते अधिक घट्ट झाले. अलीकडे संग्राम जगताप आक्रमक हिंदुत्ववादी बनले आहेत. त्यांच्या या भूमिकेचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण, आपल्या बदलत्या भूमिकेचा फायदा घेत त्यांनी भाजपला सोबत ठेवले व शिंदेसेनेचा पत्ता कापला. जगताप व भाजप एकत्र आले नसते. तर शिंदेसेना व भाजपची युती झाली असती. राष्ट्रवादीला (अजित पवार) एकट्याने निवडणूक लढणे अवघड होते. म्हणून त्यांना भाजपची गरज होती. लोकसभा निवडणुकीत अनेक शिवसैनिकांनी नीलेश लंके यांना साथ केली होती. त्याचा हिशेब विखे यांना चुकता करावयाचा होता. त्यामुळे त्यांनाही मदतीला जगताप हवे होते. शिंदेसेनेला दूर ठेऊन त्यांनी तो हिशेब चुकता केला. या निवडणुकीत शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. ही खासदार नीलेश लंके यांच्यासाठी नामुष्की आहे. त्यांचे हे अपयश आहे. या निवडणुकीत विरोधक जिगरबाजपणे लढलेच नाहीत. शरद पवार गट, ठाकरे सेना, कांग्रेस या सर्वांना मोठी संधी होती. पण हे सगळे आयत्या वेळी झोपेतून उठले.
शिंदेसेनेला तर स्वतःची ताकदच समजली नाही. ठरविले असते तर ते सत्ता आणू शकले असते. कारण लोक मजबूत विरोधकाच्या शोधात होते. पण, शिंदेसेना स्वतः तील क्षमता न ओळखता भाजपवर लाइन मारत बसली. भाजप-अजित पवार गटाचे शहरात उघडपणे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये जगणे सुरू होते. तरीही भाजप आपणाला सोबत नांदवेल असे शिंदेसेनेला वाटत होते. युती फिस्कटली तेव्हा ते उमेदवार शोधू लागले. त्यातही एकनाथ शिंदे प्रचारालाच आले नाहीत. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या घरावर छापा पडला. हा छापा म्हणजे दबावतंत्र असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. पण, शिंदेसेनेचे प्रमुख कार्यकर्ते याप्रकरणी अबोल राहिले. कांग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, ठाकरे सेनेचे किरण काळे, शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचे नेतृत्व या निवडणुकीत कोठेही उठून दिसले नाही. आम्ही हे शहर चालवू शकतो असा विश्वास ते निर्माण करू शकले नाहीत. त्या तुलनेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे शहरात तळ ठोकून होते. मंत्री विखे स्वतः भाजपमधील नाराजांच्या घरी गेले. त्यांची समजूत काढली. त्यामुळे नाराजांनी आपली नाराजी गिळून धरली. मुख्यमंत्री स्वतः प्रचाराला आले. अजित पवार प्रचाराला आले नाहीत. पण, जगताप हिंदुत्ववादी बनल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारांनीही त्यांचे उमेदवार स्वीकारले. उलट अजित पवार प्रचाराला आले असते तर हे मतदार कदाचित बिथरल असते. भाजपला शहरात प्रथमच एवढे यश मिळाले. पण सोबत जगतापांचीही ताकद वाढली आहे. अर्थात या विजयात पक्षांच्या ताकदीसोबत उमेदवारांचा वैयक्तिक करिष्माही आहे. कारण बहुतेक उमेदवार मातब्बर होते. शिवाय अनेक प्रभागांत कोणती 'माया' फिरली हे सर्व जाणतात. हा निखळ विचारांचा व विकासाचा विजय म्हणणे धाडसाचे ठरेल.
बहुमत आले खरे; पण शिंदेसेना डोळा ठेवून
महापालिकेत बहुमताला ३५ जागा लागतात. अजित पवार गटाकडे आज २७ व भाजपकडे २५ नगरसेवक आहेत. पण म्हटले तर ही त्रिशंकू अवस्था आहे. कारण या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी न पटल्यास शिंदेसेनेच्या दहा नगरसेवकांना सोबत घेऊन यापैकी कुणीही सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे कुणी रुसू नये ही काळजी या दोन्ही पक्षांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा शिंदेसेना आता टपून राहणार. सुजय विखे पाटील व संग्राम जगताप ही मैत्री कशी राहते यावर युती किती टिकणार हे ठरेल.
Web Summary : Vikhe-Jagtap alliance dominates Ahilyanagar elections, sidelining Shinde's Sena. Internal BJP disputes and strategic moves impacted results. Opposition failed to capitalize on opportunities, while Vikhe consolidated power.
Web Summary : विखे-जगताप गठबंधन ने अहिल्यानगर चुनावों में शिंदे सेना को अलग करते हुए दबदबा बनाया। भाजपा के आंतरिक विवादों और रणनीतिक कदमों का परिणामों पर प्रभाव पड़ा। विपक्ष अवसर भुनाने में विफल रहा, जबकि विखे ने शक्ति समेकित की।