"एकेकाला संपवतोच" मुलीने आईला सपोर्ट केल्याने डॉक्टर वडील संतप्त; थेट दवाखान्यात घुसवली फॉर्च्युनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:05 IST2025-11-20T17:02:41+5:302025-11-20T17:05:57+5:30
पत्नीला मदत केल्याच्या रागातून पित्याने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार संगमनेरमध्ये घडला.

"एकेकाला संपवतोच" मुलीने आईला सपोर्ट केल्याने डॉक्टर वडील संतप्त; थेट दवाखान्यात घुसवली फॉर्च्युनर
Ahilyanagar Crime: संगमनेर शहराच्या गुंजाळवाडी परिसरातील सुप्रसिद्ध संजीवन रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संस्थापक आणि भाजपचे स्थानिक नेते डॉ. भानुदास डेरे यांनी कौटुंबिक वादातून मुलीवरच जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीशी झालेल्या विभक्त झाल्यामुळे आणि मुलीने पत्नीला मदत केल्याच्या रागातून डॉ. डेरे यांनी आपल्याच रुग्णालयाच्या वेटिंग रुमवर फॉर्च्युनर गाडी वेगाने धडकवत तेथील एका कर्मचाऱ्याला चिरडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी भानुदास डेरे अटक केली आहे.
वडिलांविरोधात मुलीची थेट तक्रार
या घटनेनंतर डॉ. डेरे यांच्याच कन्या आणि याच रुग्णालयात डॉक्टर असलेल्या डॉ. एकता वाबळे यांनी वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डॉ. डेरे आणि त्यांचे सहायक सोमनाथ पवार यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून डॉ. डेरे यांना तात्काळ अटक केली आहे. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डॉ. भानुदास डेरे आणि त्यांच्या पत्नी विभक्त राहतात. त्यांची कन्या डॉ. एकता वाबळे या आईला पाठिंबा देतात आणि रुग्णालयाचे कामकाजही पाहतात. या गोष्टीचा राग डॉ. डेरे यांच्या मनात होता. अनेक वर्षांपासून ते धमक्या देऊन डॉ. वाबळे यांना रुग्णालय खाली करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते.
मंगळवारी सायंकाळी डॉ. वाबळे रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना, अचानक मोठी काच फुटल्याचा आवाज आला. कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यावर डॉ. वाबळे यांनी खाली येऊन पाहिले. रुग्णालयाच्या ग्राउंड फ्लोअरवरील वेटिंग रुममध्ये पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी उभी होती. गाडीने संपूर्ण काचेचा दरवाजा तोडला होता. गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर डॉ. डेरे बसले होते, तर त्यांच्या शेजारी त्यांचा पी.ए. सोमनाथ पवार होता. रिसेप्शनजवळ काम करणारे कर्मचारी राजेंद्र अभंग यांनी पुढे येऊन डॉ. वाबळे यांना सांगितले की, डॉ. डेरे यांनी गाडी वेगाने माझ्या अंगावर घेऊन मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने राजेंद्र अभंग बचावले.
शिवीगाळ आणि धमकी
गाडीतून खाली उतरताच डॉ. डेरे यांनी रिसेप्शन काउंटरवर लाथा मारल्या आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ते आयसीयूकडे जात आज एका-एकाला संपवतो असे ओरडत होते. त्यांचा सहायक सोमनाथ पवार सुद्धा त्यांना "डॉक्टर साहेब बिंदास राहा, गाडी पुढे घ्या आणि एका एकाला संपवून टाका" असे बोलून प्रोत्साहन देत होता. डॉ. वाबळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर हॉस्पिटलमधील स्टाफ जमा झाला. वडिलांच्या राजकीय वलयाची पर्वा न करता डॉ. एकता वाबळे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वडिलांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर तक्रार दाखल केली. संगमनेर शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.