निळवंडेला साई संस्थानने ५०० कोटी द्यावेत
By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-18T23:19:00+5:302014-07-19T00:35:17+5:30
लोणी : निळवंडे धरण कालव्यांच्या कामाकरिता शिर्डी संस्थानने ५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे़

निळवंडेला साई संस्थानने ५०० कोटी द्यावेत
लोणी : निळवंडे धरण कालव्यांच्या कामाकरिता शिर्डी संस्थानने ५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे़ विखे यांच्या या मागणीस त्यांनी प्रतिसाद देत याबाबत मुद्देसूद व सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़
जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी विखे यांनी राज्य व केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याचे प्रयत्न केले़ निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा लाभ राहाता तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील गावांना होणार आहे़
शिर्डी शहरालाही या पाण्याचा उपयोग व्हावा, असा प्रस्ताव विखे यांनी शासनासमोर मांडला आहे़ त्यासाठी शिर्डी संस्थानने निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी ५०० कोटी रुपये निधीची तरतूद करावी, अशी मागणी साईबाबा संस्थान आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विखे यांनी केली़
शिर्ङी शहरासाठी आणि संस्थानसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवावी़ यातून शिर्डीसह आजूबाजूची गावे व विमानतळासाठी शाश्वत पाणी पुरवठा होऊ शकेल, अशी वस्तुस्थिती विखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली़
शिर्डी परिसर निळवंडे धरणापेक्षा भौगोलिकदृष्ट्या खालच्या बाजूस असल्याने पाण्याच्या उपलब्धतेसाठी विजेचा खर्च येणार नाही़ याकडेही विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले़ जिरायती पट्ट्यातील शेतकऱ्यांना निळवंडे धरणाच्या पाण्याची गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा आहे़ त्यासाठी कालव्यांची कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे़
त्यासाठी लागणारा ५०० कोटी रुपयांचा निधी साई संस्थानने द्यावा, अशी मागणी विखे यांनी केली़ साई संस्थाननेही यास सकारात्मक प्रतिसाद देत त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविली असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)