निघोज : तहसीलदार ज्योती देवरे यांनी निघोज (ता.पारनेर) येथे रविवारी सायंकाळी अचानक भेट देऊन शटर अर्धे उघडे ठेऊन विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार असा पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच रॅपिड टेस्ट करण्यात आली.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वत्र कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यातच शनिवार व रविवार हे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असतो. अत्यावश्यक सेवेमधील दवाखाने, मेडिकल वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही निघोज येथे संजरी ऑटोमोबाइल्स, तुझा माझा केक शॉप, मथुरा हॉटेल, रिटेल आमराई, एक किराणा दुकान शटर अर्धे उघडे ठेवून व्यवहार करत असल्याचे तहसीलदारांच्या पथकाला दिसले. त्यांनी तत्काळ दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याशिवाय गावात विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. त्यांची जागेवचर रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर, तहसीलदार देवरे यांनी खासगी डॉक्टरांची व मेडिकल चालकांची बैठक घेतली. कोरोनासदृश्य लक्षणाचा कोणताही रुग्ण आल्यास त्याला त्वरित आरोग्य केंद्रात चाचणीसाठी पाठवून द्या. आलेल्या अहवालानुसार रुग्णांवर रुग्णालयातच भरती करायची आहे. कोणालाही घरी राहण्यास परवानगी देऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या.
--
आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. कोरोनाबाबतच्या प्रशासनाच्या नियमांचे कोणीही उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत.
-ज्योती देवरे
तहसीलदार, पारनेर
----
१७ निघोज१
निघोजमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे व इतर.