साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 05:50 IST2024-12-17T05:49:43+5:302024-12-17T05:50:59+5:30
‘डेटा’ संरक्षित करणार; ‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम

साईबाबांच्या मूर्तीचे करणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; २० डिसेंबरला समाधी मंदिर दुपारी ३ तास बंद
प्रमोद आहेर, लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : साई संस्थानने साईमंदिरातील मूर्तीचा थ्रीडी स्कॅनिंगद्वारे ‘डेटा’ संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे. या स्कॅनिंगसाठी २० डिसेंबर रोजी दुपारी दीडनंतर मंदिर तीन तास भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मूर्तीची झीज होत आहे. भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्याने ‘थ्रीडी स्कॅनिंग’द्वारे डेटा संरक्षित केला जाईल.
थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे काय?
- थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे. ही वस्तू किंवा वातावरणाचे विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा, शक्यतो त्याच्या स्वरूपाचा (उदा. रंग) त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे.
- संकलित डेटा नंतर डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो. साईमूर्तीची ३६० अंशांच्या कोनातून चोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे. या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले
जाणार आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणाम
तदर्थ समितीचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व प्रभारी सीईओ तुकाराम हुलवळे यांनी ‘लोकमत’च्या बातमीची दखल घेत ५ मार्च २०२४ च्या बैठकीत मूर्तीच्या ‘थ्रीडी स्कॅनिंग’साठी ‘लोकमत’च्या उल्लेखासह ठराव संमत केला.
यानंतर सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. परिणामी २० डिसेंबर रोजी दुपारी हे ‘स्कॅनिंग’ होत आहे.