लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहराचा विकास खुंटला असला तरी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात आहेत. रियल इस्टेटमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असून, नगर शहरात तब्बल २६ हजार मोकळे भूखंड असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे.
नगर शहरात सावेडी, केडगाव, नागापूर बोल्हेगाव आदी उपनगरांतील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. स्वत: घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. भूखंडांबाबतच्या अनेक तक्रारीही दाखल होत आहेत. असे असले तरी रियल इस्टेटमध्ये होणारी गुंतवणूक थांबलेली नाही. दिवसेंदिवस ही गुंतवूणक वाढत आहे. महापालिकेच्या दप्तरी झालेल्या नोंदणीवर नजर टाकल्यास नगर शहरातील भूखंडांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली गेल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील एकूण मालमत्तांची संख्या १ लाख १७ हजार इतकी आहे. यापैकी ९० हजार इमारती असून, मोकळ्या भूखंडांची संख्या २६ हजार ४०० एवढी आहे. एका व्यक्तीकडून भूखंड दुसऱ्या व्यक्तीला विकला जातो. परंतु, त्यावर बांधकाम होत नाहीत. त्यामुळे हे भूखंड वर्षानुवर्षे विनावापर पडून आहेत. भूखंड खरेदी- विक्रीतून चांगले पैसे मिळतात. जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार करून देणाऱ्यांचे पेव फुटले आहे. यातून वाद होण्याच्या घटनाही घडत आहेत. भूखंडांवर अतिक्रमण करून बळकावणे, यासारख्या सर्वाधिक तक्रारी आहेत.
मनपाकडून कर अकारणी
भूखंड खरेदी केल्यानंतर त्याची महापालिकेत नोंद केली जाते. ही नोंद करणाऱ्यांकडून कर वसूल केला जातो. यातून महापालिकेला मोठे उत्पन्नही मिळते. हा कर खरेदीदाराला भरावा लागतो. परंतु, बहुतांश भूखंडांची परस्पर विक्री होत असल्याने बांधकामाच्यावेळी महापालिका कर भरून घेत असल्याने अनेकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो.
.....
महापालिकेत नोंदणी झालेल्या मोकळ्या भूखंडावर कर अकारला जातो. महापालिकेत २६ हजार ४०० भूखंडांची नोंद करण्यात आली असून, या सर्व भूखंडाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- गवाजी झिने, कर मूल्य निर्धारण अधिकारी, महापालिका.
डमी नंबर- ८२५